आमचे पहिले मुख्याध्यापक व संस्थेचे पहिले सेक्रेटरी गुरुवर्य शंकरराव रामचंद्र कानिटकर
वि. त्र्यं. ताटके (मुख्याध्यापक) (लेखनकाल १९६४)
दि. १० जून १९२९ रोजी मी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो. पहिल्या वर्षी मला ९ वी व १० वी ला सायन्स शिकवण्यास दिले होते. थोड्याच दिवसांत मला दिसून आले की शिक्षक व विद्यार्थी या दोघांवरही कानिटकरांचा चांगलाच दरारा आहे. मला मात्र तो कधीच वाटला नाही. कारण ते माझ्या वर्गावर एकदाच आले होते. व 'बरे चालले आहे; पण मुलांना जरा चौपत चला' एवढाच सल्ला त्यांनी मला दिला.
याच काळात नवीन लहान शाळा काढण्याच्या आमच्या वाटाघाटी चालू झाल्या. न्यू इंग्लिश स्कूलमधील पटवर्धन, कोपरकर, दामले, जी. जी. जोशी व मी ही सर्व तरुण मंडळी व आपटे, पटवारी, करंदीकर ही जरा वयस्कर मंडळी या नवीन शाळेत येण्यास कबूल झाली. शाळा सुरू होण्यापूर्वी बरेच महिने मी, माझे मित्र केशवराव कानिटकर यांच्याकडे जाऊन नवीन शाळेसंबंधी प्राथमिक चर्चा करीत असू. शाळा काढण्याचे साधारण जानेवारी १९३४ मध्ये मुक्रर झाल्यानंतर जागेचा प्रश्न आला. मेहुणपुऱ्यातील रास्ते यांच्या मोकळ्या जागेचा भाग व गोंधळेकर यांचा जगहितेच्छू छापखाना ज्या वाड्यात होता तो वाडा मुक्रर करण्यात आला. हा वाडा नातूंच्या ताब्यात होता. तो मुदतीच्या भाडेपट्ट्याने घेणे वगैरे कामे प्रस्तुत लेखकाने कानिटकरांच्या देखरेखीखाली केली. शाळा कोणाकरिता, नाव कोणते, या प्रश्नांवर आमच्यात खूप चर्चा झाली. आमच्यातील एकाने शाळा मुलींकरता काढावी असे सुचवले. मी याला साफ विरोध केला. शेवटी शाळा मुलांकरता, पण मुली घेण्यास हरकत नाही असे ठरले, कानिटकरांनी 'सिटी हायस्कूल' हे नाव सुचवले. पण मला हे नाव स्थानिकपणा दर्शवणारे व संकुचित वाटले. एल्. के. गोडबोले यांनी स्कूलला 'मॉडर्न नाव देण्यास सुचवले व नंतर शाळेचे नाव 'मॉडर्न हायस्कूल' ठरले. मला फार आनंद झाला. नावात काय आहे असे म्हणणारांना 'अहो नावात जादू आहे' असे माझे उत्तर आहे.
एप्रिल १९३४अखेर रीतसर न्यू इंग्लिश स्कूलमधून निवृत्त झाल्यानंतर आम्ही सर्वजण कामाला लागलो. कारण चार जूनला शाळा उघडावयाची असे ठरले होते. या कामात श्री. भाऊसाहेब लिमये व केशवराव कानिटकर यांची खूपच मदत झाली. श्री. शंकरराव कानिटकर त्या महिन्यात युनिव्हर्सिटीच्या कामात मुंबईत अडकले होते. अर्थात तरी त्यांचा जीव पुण्यात अडकलेला असे. में च्या शेवटच्या आठवड्यात त्या वेळचे इन्स्पेक्टर कॅमेरॉन शाळा (फक्त इमारत) पाहायला आले. आमची शाळाच निघू नये, निदान तिच्यावर काही अटी घालाव्यात अशी चळवळ पुण्यातील काही मंडळींनी केली व कॅमेरॉनसाहेबांनी अटी मांडल्या. त्या ऐकल्याबरोबर शंकरराव कानिटकर उसळून म्हणाले, "ते काही नाही, शाळा निघणारच, आम्ही अटीबिटी काही जाणणार नाही." मोठ्या आवाजात चाललेले हे संभाषण नंतर निवले. माझी खात्री होती की रागावलेल्या कॅमेरॉनला आमचे शंकरराव सहज गुंडाळतील व आपलेसे करतील. आणि हे खरे ठरले. पुढे दोन महिन्यांनी शाळा सुरू झाल्यावर तिचा थाटमाट, व्यवस्थितपणा, आमची ती छोटीशी पण सुंदर प्रयोगशाळा, मुक्तद्वार वाचनालय, पट्टीचा हुशार शिक्षकवर्ग व पराक्रमी विद्यार्थिवर्ग पाहून कॅमेरॉनसाहेब खूश झाले. "शाळेला सरकारी व विश्वविद्यालयाची मान्यता नाही. मग तुम्ही कसे आलात?" हा प्रश्न कॅमेरॉन यांनी वर्गातील मुलांना विचारला. एका मुलाने तितक्याच जोराने उत्तर दिले, "आमचा कानिटकर व आमचे शिक्षक यांवर विश्वास आहे!" जाताना, "शाळेला कायमची मान्यता देणार आहे, शाळेवर मी खूश झालो" असे कॅमेरॉन उद्गारले. रागवावयाचे कोठे, सौम्य कोठे रहावयाचे, प्रसंगी प्रांजळपणाचा आव आणून पड खाल्ल्यासारखे कोठे दाखवायचे या कलेत आमचे शंकरराव निष्णात होते !
शाळेत पहिल्या दिवशी ११ वीत ४-५ विद्यार्थी होते. त्यांतील एकाने वाह्यातपणा केला. कानिटकरांनी दुसऱ्या दिवशी त्याला शाळेतून काढून टाकले. मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक नामवंत असल्याने १५ दिवसांत मॅट्रिकच्या तीन तुकड्या भरल्या. उलट ६वीत अवघे १२ विद्यार्थी होते. कानिटकरांनी ३२५ विद्यार्थ्यांचे बजेट केले. मी ५०० विद्यार्थ्यांचे केले. त्यांचे म्हणणे खरे ठरले. व्यवहारीपणात कानिटकरांना तोड नव्हती, हा आमचा नेहमीचा अनुभव. भूगोल शिकवण्यास पट्टीचा शिक्षक नव्हता. मी हे काम मॅट्रिकच्या वर्गापुरते पत्करले. भूगोल त्या वेळेस इंग्रजीत शिकवावा लागे. मी तर गणिताचा शिक्षक. कानिटकरांनी १०वीचा भूगोल शिकवण्याचे काम पत्करले. त्यांनी अनेक पुस्तके वाचून त्यांतील महत्त्वाचा भाग अधोरेखित केला. अद्यापिही हे साहित्य लायब्ररीत पहावयास मिळेल. मी तर पुढे या विषयात दर्दीच ठरलो. विषयाची तयारी करण्याची स्फूर्ती त्यांनीच दिली. शाळेची कीर्ती पसरत चालली. याचे कारण पहिल्या वर्षीच लागलेला मॅट्रिकचा निकाल, कानिटकरांची कडक शिस्त व आमचे विद्यार्थी. विद्यार्थ्यांत शाळेबद्दल प्रेम व आपलेपणा उत्पन्न करा तेही स्वतःच्या उदाहरणाने, म्हणजे विद्यार्थी पराक्रमी होतील असे कानिटकरांचे म्हणणे असे. त्यातील मर्म आम्ही ओळखले. मॉडर्न हायस्कूलच्या यशाचे मर्म यात आहे. "अनुहंकुरुते घनध्वनिम् नहि गोमायुरुतानि केसरी" असे मी विद्यार्थ्यांना नेहमीच सांगतो.
कानिटकर वर्गात वेळापत्रकाप्रमाणे फारसे शिकवीत नसत. ते त्यांच्या स्वभावाला धरून नव्हते. तो भाग त्यांनी बहुतांशी आमच्या सर्वांवर सोपवला होता. पाच वर्षांत शाळा बाहेर न्यावयाची ही अट. त्याप्रमाणे कानिटकर उद्योगास लागून त्यांनी हल्लीची जागा मिळवण्यात यश मिळवले व इमारतीचे कामही झपाट्याने सुरू झाले. क्रीडांगणावर असंख्य खाचखळगे व अनेक खोल डबकी होती. डबकी नव्हती तेथे उंच खडक होते. डबकी बुजवण्याचे काम नगरपालिकेच्या मोटारींनी गावातील केरकचरा आणून पूर्ण केले. माझ्या हिशेबाने एकूण कचरा ५०-६० हजार मोटारगाड्या असाव्यात. कचरा भरण्याचे काम सुरू झाले; पण नवीनच संकट ओढवले. कचऱ्यामुळे माझ्या झाल्या व पावसाळ्यात कचरा कुजला. घाण सुटली. जवळपासच्या लोकांनी आमच्याविरुद्ध अर्ज केले त्यातच नगरपालिकेचा एवढा कचरा कोणाला विचारून टाकीत आहेत, अशी तक्रार कलेक्टरांकडे गेली. त्यातच भर म्हणून की काय, एके दिवशी मी हजर नसताना सुरुंगवाल्याने सुरुंगाची दारू जरा जादा घातल्याने खडकाचा स्फोट होऊन एक मोठा तुकडा ३०० यार्डावर असलेल्या एका बंगल्याच्या आवारात पडला व दुसरा डी.एस.पी. साहेबांच्या बंगल्याच्या आवारात पडला. आमच्याविरुद्ध फौजदारी फिर्याद नोंदवली गेली. त्या वेळेपासून अर्थात सुरूंगाने खडक फोडणे बंद झाले व माझाही दुपारचा १२च्या उन्हातील हेलपाटा वाचला. हे काही दिवस कानिटकरांना अतिशय मानसिक त्रासाचे गेले. पण कानिटकरांच्या कौशल्याने व अनेक युक्त्या प्रयुक्त्यांनी हे वादळ शमले. हे सर्व एक-दोन मंडळींशिवाय कानिटकर कोणाशी बोलत नसत. 'अहो माझे हे म्हातारपणचे लग्नः ते दुसऱ्याला सांगून फजिती का करून घ्या !' असे ते विनोदाने म्हणत असत. शाळा नवीन डौलदार वास्तूत आली. सर्व तर्हेने सुसज्ज झाली. विस्तीर्ण क्रीडांगण मिळाले. सर्वच हेवा वाटण्याजोगे ! कानिटकरांची करडी पण प्रेमळ शिस्त, वाकबगार व मेहनती शिक्षकवर्ग आणि प्रसन्न वातावरण! गावातील मुले यावीत म्हणून फुकट 'स्कूलबस' ठेवली होती. आता प्रसंग मुले न आली तर बरी! या पाच-सहा वर्षांत (१९३४ ते ४०) कानिटकरांना अतिशय मेहनत पडली, मानसिक त्रास झाला. "हल्ली मला काळजीने झोप येत नाही" असे ते मजजवळ म्हणाले होते. पण त्यांच्या रागीट व तापट स्वभावामुळे त्यांच्याशी जास्त सलगी करून काम करणे ही बाब सोपी नव्हती, पण आम्ही शाळेची आंतरआघाडी भक्कमपणे सांभाळली होती. त्यामुळे उत्पन्न झालेला शाळेचा दरारा कानिटकरांना बाहेरच्या कामांत उपयोगी पडला, हे ते जाणून होते. "तुम्ही सकाळचा वेळ क्रीडांगणावर घालवू नका, शिकवण्या करा. अहो मी संन्यस्त आहे. माझा संसार पूर्ण झाला आहे." असे ते मला म्हणाले होते. सहकाऱ्यांशी प्रेमाने वागण्याचा हा एक नमुना आहे. मी एकदा आजारी पडल्यावर जवळजवळ सहा-सात तास सतत ते माझ्या जवळ बसलेले मला आठवतात. कोणत्याही शिक्षकाचे आर्थिक नुकसान त्यांनी कधीच केले नाही.
मुलांना छडीने मारणारे कानिटकर त्यांच्या हिताकरता किती जागरूक असत याचे एक उदाहरण सांगतो. ते क्रीडांगणावर अनेकवेळा पीचवरील खडे काढीत असत. रूळ फिरवीत असत, पाणी टाकीत असत. मुलांनी मॅच जिंकली की अनेकदा आम्ही मोठा खाण्याचा खर्च करत असू, त्यांनी तो कधीही नाकारला नाही. खाण्यापिण्यात किंवा खर्चात एकंदरीत ते उदार असत. ज्याच्यावर त्यांचा विश्वास त्याने केलेल्या खर्चाबद्दल त्यांनी कधीही ब्र काढला नाही. प्रस्तुत लेखक या भाग्यवंतांपैकी एक होता. कार्यकारी मंडळात कानिटकरांना Hon. Or-ganizer and Educational Advisor ही मानाची जागा दिली गेली. त्यानंतर ७-८ वर्षे आम्हांला त्यांच्या सल्ल्याचा अतिशय उपयोग झाला. 'सर्वांना सारखे व एकच माप' व 'चुकल्यास क्षमा नाही' ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये सर्वांच्या परिचयाची होती, पण त्यांची बोर कामगिरी, तापट पण निष्कपटी स्वभाव, करारी वागणूक, कामावरील निष्ठा व पराक्रमी जीवन यांची सर्वांना जाणीव होती. आणि म्हणूनच "En-gland with all thy faults, I love thee still" असे इंग्रज कवीने इंग्लंडसंबंधी म्हटले आहे. त्यात मी England ऐवजी कानिटकर हे शब्द घालीन व तेच कानिटकरांसंबंधी म्हणेन.