आदरणीय प्रा. डॉ. गजानन एकबोटे

लवण मेळविता जळे। काय उरले निराळे ॥ तैसा समरस झाली। तुजमाजी हरपलो ॥

आपले आयुष्य संस्थेच्या, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी वेचताना संस्थेच्या कार्याशी एकरूप झालेले व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय प्रा. डॉ. गजानन एकबोटे!

स्वतःसाठी सारे जगतात, पण कधीतरी दुसऱ्यासाठी जगून पहावं,
वातीसारखं जळत जाऊन शेवटपर्यंत अंधारात तेवत रहावं!

आपल्या कार्याचा नंदादीप सदैव तेवत ठेवणारे डॉक्टरसाहेब!

गुरुवर्य कानिटकर सरांनी १९३४ साली मॉडर्न हायस्कूलच्या रूपाने शैक्षणिक बीज लावले. आज या बीजाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्रात एक नावाजलेली शैक्षणिक संस्था! ७५ वर्षांची लखलखीत परंपरा लाभलेली, भविष्याची जाण ठेवून विद्यार्थ्यांच्या भविष्याची पहाट फुलवण्यासाठी सदैव पुढे असणारी, नावाप्रमाणे प्रगती करणारी आपली संस्था.

आज संस्थेच्या ५६ विविध शाखा दिमाखात उभ्या आहेत याचे सर्व श्रेय जाते संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे यांना. संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

'माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी' – श्रीज्ञानदेव
'हाधि नेम आता, न फिरे माघारी' – श्रीतुकोबाराय

ह्याच संतविचारांच्या मार्गाने ज्ञानदिंडीची पताका घेऊन अविरत ही ज्ञानगंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची धडपड करणारे, निःस्वार्थ, अभ्यासू नेतृत्व संस्थेला लाभले आणि बघता बघता संस्थेचा विस्तार झाला.

प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे — एक अभ्यासू, विद्वान, उत्साही व्यक्तिमत्त्व! फुलणं, फुलवणं, आनंदानं भरून पावणं, जगताना हे सगळंच असतं बिकटः तरीही आपण नाही सोडायचं या वाटेवरून चालणं... एक अविराम प्रवास!

कनिष्ठ मध्यमवर्गातील एकबोटे कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती बेताची, वडील श्री. दादा एकबोटे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक! घरातून परिस्थितीवर मात करण्याचे संस्कार मिळाले. त्यांनी सर्व शिक्षण कष्टातून, शिष्यवृत्तीवर पूर्ण केले. आपल्या गुणवत्तेने परिस्थितीवर मात करून एम.बी.बी.एस. ची पदवी प्राप्त केली.

पुढे All India Medical Entrance मध्ये भारतात दुसरे क्रमांक मिळवून AIMS या सर्वोच्च वैद्यकीय संस्थेत सर्जरीस प्रवेश मिळवला. पुण्यातील पहिले M.N.A.M.S. होण्याचा मान मिळवला. वैद्यकीय क्षेत्रातील M.S. या पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. आजही ससून हॉस्पिटलमध्ये विनामूल्य सेवा देत आहेत आणि बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये ३० वर्षांपासून अध्यापन करतात.

१९९४ साली त्यांनी संस्थेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा हाती घेतली आणि सातत्य, चिकाटी, ध्येयासक्ती यांच्या जोरावर संस्थेचा आलेख नेहमीच प्रगतिपथावर ठेवला.

डॉक्टरांनी सामान्य विद्यार्थ्यांचा विचार करून शिशुविद्या मंदिरापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, बायोटेक्नॉलॉजीपर्यंत विविध शाखा उभारल्या. शिक्षणात गुणवत्ता आणि संस्कार यांचा सुंदर संगम साधला. त्यांनी नेहमी भारतीय संस्कृतीतील आदर्श मूल्यांचा सन्मान राखला.

त्यांचं जीवन म्हणजे सळसळतं चैतन्य! समाजातील सर्व घटकांचा सहभाग असलेली संस्था उभी करणे, शिक्षकांचा आणि महिलांचा सक्रिय सहभाग ठेवणे — हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.

संस्थेच्या वाढत्या कार्यात डॉक्टरांच्या निःस्वार्थ सेवेमुळे २५ वर्षांत प्रचंड विस्तार झाला. त्यांनी अनेक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम सुरू केले — जसे की गीतरामायण, आयुष्यावर बोलू काही, 'करिअर संवाद' व्याख्यानमाला, 'कानिटकर पुरस्कार' इत्यादी.

साधी राहणी, उच्च विचारसरणी!

त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही तेजाने झळकत आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर व भारतीय नियोजन आयोगाच्या शिक्षण सल्लागार समितीवर सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे.

त्यांचे आई-वडील व पत्नी प्रा.डॉ.सौ.ज्योत्स्ना एकबोटे यांचा मोठा वाटा त्यांच्या यशात आहे, असे ते नेहमी मानतात. हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व मॉडर्न हायस्कूल, पुणे-५ चे माजी विद्यार्थी असल्याचा आम्हाला अभिमान आहे.

“मी शिक्षणक्षेत्रातील वारकरी आहे. विद्यार्थी माझे दैवत आहे.”

विद्यार्थ्यांमध्ये समाजप्रेम, देशप्रेम आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचं पवित्र कार्य त्यांनी आयुष्यभर केलं आहे. त्यांच्या कार्याला आमचा मनःपूर्वक सलाम!

मेघ नम्रपणे उभा राहिला आकाशाच्या कोपऱ्यात
आणि सकाळ त्याला वैभवाने सजवले
तुमची तपश्चर्या अशीच फळाला येवो
आणि कीर्ति किरणांच्या प्रकाशाचा दैदीप्यमान झोत तुमच्या उद्याच्या भविष्यावर पडो.